छत्रपती संभाजीनगर : ज्या सणाची अवघा देश आतुरतेने वाट पाहत आहे, तो सण म्हणजे दिवाळी.. दिव्यांचा उत्सव.. दिवाळी हा सण हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि आनंदाचा सण मानला जातो. दिव्यांची रोषणाई, आकर्षक रांगोळ्या, फराळाचा सुगंध आणि लक्ष्मीपूजनाचा मंगलमय सोहळा यामुळे या सणाची सर्वांनाच उत्सुकता असते. यंदा ५ नोव्हेंबर २०२६ पासून दिवाळीच्या उत्सवाला सुरुवात होणार असून ११ नोव्हेंबरला भाऊबीजेने या दीपोत्सवाची सांगता होणार आहे. विशेष म्हणजे यंदा नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी येत आहेत. त्यामुळे वसुबारस, धनत्रयोदशी, अभ्यंगस्नान, लक्ष्मीपूजन ते भाऊबीज या सर्व सणांच्या तारखा आणि शुभ मुहूर्त जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
१. वसुबारस गुरुवार, ५ नोव्हेंबर २०२६ - पूजा मुहूर्त : सायंकाळी ५:३६ ते रात्री ८:११.
दिवाळी उत्सवाची सुरुवात वसुबारस या सणाने होते. या दिवशी गाय आणि वासराची पूजा करण्याची परंपरा आहे. हिंदू धर्मात गायीला मातेचे स्थान दिले जाते. त्यामुळे वसुबारसच्या दिवशी गायीची पूजा करून कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी आणि संततीच्या कल्याणासाठी प्रार्थना केली जाते. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या दिवशी विशेष पूजा केली जाते.
२. धनत्रयोदशी शुक्रवार, ६ नोव्हेंबर २०२६ -
लक्ष्मी-कुबेर पूजन : सायंकाळी ६:३२ ते रात्री ८:३१.
धनत्रयोदशीला धनतेरस असेही म्हटले जाते. दिवाळीतील हा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी भगवान धन्वंतरी, माता लक्ष्मी आणि कुबेराची पूजा केली जाते. सोने, चांदी, नवीन भांडी किंवा घरासाठी वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. धनत्रयोदशीला नवीन वस्तूंची खरेदी केल्याने घरात सुख, समृद्धी आणि धनधान्य वाढते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
खरेदीसाठी शुभ मुहूर्त
सकाळी ८ ते ११ लाभ-अमृत योग
दुपारी १२:३० ते २ शुभ योग
रात्री ९:३० ते ११ लाभ योग
यमदीपदान मुहूर्त : सायंकाळी ५:४५ ते रात्री ७:२०.
३. नरक चतुर्दशी रविवार, ८ नोव्हेंबर २०२६ - अभ्यंगस्नान मुहूर्त : पहाटे ५:३४ ते ६:३३.
नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी असेही म्हटले जाते. या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान करण्याची विशेष परंपरा आहे. सुगंधी तेल आणि उटणे लावून स्नान केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान श्रीकृष्णाने या दिवशी नरकासुराचा वध करून जनतेला त्याच्या अत्याचारातून मुक्त केले होते. त्यामुळे वाईट प्रवृत्तींचा नाश आणि चांगुलपणाचा विजय म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
४. लक्ष्मीपूजन रविवार, ८ नोव्हेंबर २०२६ - लक्ष्मीपूजन मुहूर्त : सायंकाळी ६:२६ ते रात्री ८:२६.
दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा आणि मंगलमय दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. या दिवशी माता लक्ष्मी, भगवान गणेश आणि देवी सरस्वती यांची पूजा केली जाते. घरात सुख, समृद्धी, धनधान्य आणि भरभराट नांदावी, यासाठी भाविक मनोभावे लक्ष्मीपूजन करतात. घराची स्वच्छता, आकर्षक रांगोळ्या, पणत्या आणि दिव्यांची रोषणाई करून लक्ष्मीचे स्वागत केले जाते. यंदा विशेष म्हणजे नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आल्याने ८ नोव्हेंबरला दिवाळीचा मुख्य उत्सव साजरा केला जाणार आहे.
शुभ-अमृत योग : सायंकाळी ६:३० ते रात्री ९:३०.
५. दिवाळी पाडवा मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६ -
सकाळी ९:२५ ते दुपारी १:३२
दिवाळी पाडव्याला बलिप्रतिपदा असेही म्हटले जाते. या दिवशी राजा बळी आणि भगवान विष्णूच्या वामन अवताराचे स्मरण केले जाते. महाराष्ट्रात दिवाळी पाडव्याला विशेष महत्त्व आहे. पती-पत्नीच्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि समर्पण व्यक्त करण्याचा हा दिवस मानला जातो. पत्नी पतीला औक्षण करते, तर पती पत्नीला भेटवस्तू देऊन प्रेम व्यक्त करतो.
शुभ मुहूर्त
सकाळी ११ ते दुपारी २ - लाभ-अमृत योग
दुपारी ३:३० ते सायंकाळी ५ - शुभ योग
६. भाऊबीज बुधवार, ११ नोव्हेंबर २०२६ - ओवाळणी मुहूर्त : दुपारी १:३० ते ३:४५.
दिवाळी उत्सवाची सांगता भाऊबीजेच्या सणाने होते. भाऊबीज हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा सण आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाला औक्षण करून त्याच्या दीर्घायुष्याची आणि सुखी आयुष्याची प्रार्थना करते. भाऊही बहिणीला भेटवस्तू देऊन तिच्याप्रती असलेले प्रेम व्यक्त करतो. त्यामुळे या सणाला कौटुंबिक आणि धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे.
यंदा दिवाळीचा उत्सव कधीपासून कधीपर्यंत?
२०२६ मध्ये दिवाळीचा उत्सव ५ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून ११ नोव्हेंबरला भाऊबीजेने संपणार आहे. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज अशा विविध सणांमुळे संपूर्ण आठवडा आनंद आणि उत्साहात साजरा होणार आहे.